जालना - अंबड शहरातील जालना-बीड रोड वरील पाचोड नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी दिवसभर अंबड तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटे साडेतीन वाजता सुरु झालेला पुतळा उभारणीचा थरार सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. पुतळा उभारणीस शासकीय परवानगी नसल्याने अंबड पोलिसांनी पुतळा उभारण्यास प्रतिबंध केल्याने आ. नारायण कुचे व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. विनापरवानगी पुतळा उभारल्याप्रकरणी आ. कुचे यांच्यासह ४४ व्यक्तींना अटक करून शुक्रवारी दुपारी अंबड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अंबड न्यायालयाने सर्व ४४ जणांना १६ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याने शुक्रवारी दुपारी सर्वांची जालना येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
अंबड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती,या मागणी संदर्भात विविध पक्ष व संघटनांनी कायदेशीर पाठपुरावाही केला होता. मात्र राज्यमार्ग व महामार्गावर पुतळा उभारण्यास कायद्याची परवानगी नसल्याने यासंदर्भात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. दोन वर्षापूर्वी झालेल्या अंबड नगरपालिका निवडणुक जाहीरनाम्यात आ.नारायण कुचे यांनी अंबड शहरात भव्य अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा उभारू असे आश्वासन दिले होते. अंबड नगरपालिकेची सत्ता ताब्यात येताच आ. कुचे यांच्या सूचनेप्रमाणे अंबड नगरपालिकेने शहरातील जालना-बीड मार्गावरील पाचोड नाका येथे पुतळा उभारण्यासाठी पालिका सभागृहात ठराव मंजूर करून चौथरा निर्माण केला होता, मात्र पुतळा उभारणीसाठी कायदेशीर अडचणी येत असल्याने आ. कुचे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाचोड नाका येथे क्रेनच्या सहाय्याने पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला, पुतळ्याची उंची आकार मोठा असल्याने सहाजिकच एवढा मोठा पुतळा बसवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर,पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली.पोलीस निरीक्षक नांदेडकर यांनी पुतळा राज्यमार्ग व महामार्गावर पुतळा उभारणीसाठी कायद्याची परवानगी नसल्याचे सांगत पुतळा उभारू नये अशी सूचना केली, मात्र पुतळा उभारणी संदर्भात आग्रही असल्याने आमदार कुचे व पोलीस निरीक्षक नांदेडकर यांच्या मध्ये जोरदार बाचाबाची सुरुवात झाली दरम्यान क्रेनच्या सहाय्याने हवेत असलेला पुतळा चौथर्यावर बसवण्यात आला.हा सर्व घटनाक्रम घडत असताना सूर्योदय झाला व याठिकाणी हळूहळू नागरिकांची गर्दी वाढू लागली. महामार्गावर बेकायदेशीरपणे पुतळा उभारण्यात आल्या प्रकरणी आ. नारायण कुचे यांच्यासह ४४ जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात कलम १४३,१४९,१४७,४४७ तसेच महाराष्ट्र राज्य पुतळ्याचा पावित्र्य भंग प्रतिबंध कलम ११ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.आ. कुचे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केल्याची बातमी संपूर्ण तालुक्यात पसरली. थोड्याच वेळात कार्यकर्त्यांचा ओघ अंबड पोलीस ठाण्याकडे वाढू लागला. सर्व आरोपींना अंबड न्यायालयासमोर हजर केले असता अंबड न्यायालयाने 16 सप्टेंबर पर्यंत सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी दुपारी सर्व ४४ जणांची न्यायालयीन कोठडीसाठी जालना मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुरु झालेला थरार सायंकाळी उशिरापर्यंत कायम होता.
अंबड शहरातील पाचोड नका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. विनापरवानगी पुतळा उभारण्यात आल्या प्रकरणी माझ्या सह ज्या ४४जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांची नावे आपण तपासून पाहिल्यास त्यामध्ये हिंदू,मुस्लिम,बौद्ध या सर्व धर्मा बरोबरच सर्व जातीतील व्यक्तींची नावे आपणास आढळतील. याचाच अर्थ महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारावा सर्व नागरिकांची मागणी होती व नागरिकांच्या मागणीची पूर्तता करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. तेच कर्तव्य मी पार पाडले आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. - आमदार नारायण कुचेपोलीस खाते हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असते. पुतळा उभारणीसाठी कायदेशीर परवानगी नसल्याने अंबड पोलिसांनी पुतळा उभारणीस प्रतिबंध केला होता. केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे एवढाच अंबड पोलिसांच्या कारवाईचा हेतू होता व आहे. - अनिरुद्ध नांदेडकर, पोलीस निरीक्षक