जालना : कोरोनाच्या आजाराने जिवंतपणी छळले जाते... हे मान्य आहे, परंतु कोरोनावर उपचार सुरू असताना जर कितीही प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इच्छा असूनही अनेकांना अंत्यसंस्कार विधिवत करता येत नाहीत. तर काही प्रकरणांमध्ये मात्र वेगळे अनुभव असून, रक्ताची नातीही पाणी देण्यासाठी पुढे येत नसल्याचे वास्तव अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाचा कहर सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात जवळपास ४६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात कोरोनावर ३७ हजार जणांनी मात केली आहे. कोरोनामुळेच केवळ मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे खूप नगण्य आहे. अन्य आजार असल्याने देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह ही कारणे आहेत. हे मृत्यू झाल्यावर अनेक नातेवाईक हजर असतात. परंतु ते अंत्यसंस्काराच्यावेळी बाहेरच राहून आम्हालाच अंत्यसंस्कार करण्यात सांगत असल्याचे दिसून आले.
शहरात मृत्यू वाढले
जालना शहरात मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. जवळपास वर्षभरात कोरोनाने ३६५ मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यात जालना शहरच कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता.
५ माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही
मागील काही महिन्यांमध्ये जालन्यातील गांधीनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षभरात ३४५ पेक्षा अधिक मृतदेहांवर जालना पालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले आहेत. यावेळी जवळपास १५ पेक्षा अधिक नातेवाईकांनी मृतदेहाला पाणी पाजण्यासाठी देखील पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे अशा मृतदेहांवर आम्हीच शक्य तेवढे रितीरिवाज पाळून अंत्यसंस्कार केले आहेत. अनेकजण हे स्मशानभूमीपासून शंभर फूट दूर राहूनच मृतदेहाचे अंतिम दर्शन घेऊन अंत्यसंस्कार होईपर्यंत थांबत असल्याचे दिसून आले.
गेल्या वर्षभरापासून आम्ही दहाजण कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करत होतो, परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये अचानक कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पंधरा माणसे अतिरिक्त देण्यात आली आहेत. त्यामुळे आमच्यावरील ताण हलका झाला आहे.
- अरुण वानखेडे
कोरोना मृतांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे. त्यामुळे कधी दफनविधी तर कधी अग्नीडाग द्यावा लागतो, परंतु अनेक मयतांचे नातेवाईक दूरवरून शोक व्यक्त करतात. तर काहीचे नातेवाईकही अंत्यविधीला येत नाहीत.
- शोएब खान