जालना : कोरोना काळात यंदा जालना पालिकेची मालमत्ता कराची वसुली अत्यंत नगण्य झाली आहे. पालिकेचे नागरिकांकडे ६२ कोटी रुपये थकले असून, आगामी वर्षात थकबाकी वसुलीसाठी दहा पथकांची स्थापना केली आहे.
जालना पालिकेने मागीलवर्षी नवीन कर मूल्यांकन केले होते. त्यामुळे मालमत्ता करात मोठी वाढ झाली आहे. हे मूल्यांकन तब्बल दहा वर्षांनी करण्यात आल्याचे पालिकेने नमूद केले. शहरातील नवीन वसाहतींमध्ये सर्वेक्षण करून नवीन मूल्यांकन करण्यात आले आहे. यासाठी एका कंपनीने स्वतंत्र सर्वेक्षण केले आहे. ही कर आकारणी खूप अधिक झाल्याच्या तक्रारी जालन्यातील तीन हजारपेक्षा अधिक नागरिकांनी केल्या आहेत. कर वाढीच्या मुद्दयावर आक्षेप घेतले होते. या आक्षेपांवर सुनावणी होऊन हे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. कोरोनामुळे चालू वर्षात पालिकेला केवळ ८९ लाख रुपये वसूल करता आले. ही वसुलीदेखील केवळ नवीन बांधकाम करावयाचे असल्याने ते झाल्याचे सांगण्यात आले. कोरोनामुळे राज्य आणि केंद्र सरकारने कर्ज, तसेच अन्य वसुलीसाठी नागरिकांना जास्त पाठपुरावा करू नये असे नमूद केले होते. त्यामुळे जालन्यातील नागरिकांनीदेखील हे कारण देत वसुली टाळली आहे.
ही वसुली या वर्षात होऊ शकली नसली तरी आम्ही आता जानेवारीपासूनच बड्या थकबाकीदारांना नोटीस बजावून त्यांच्याकडून प्राधान्याने कर वसूल करणार आहोत. विशेष म्हणजे एमआयडीसीतील उद्योजकांकडून ती प्राधान्याने वसूल करणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात आपण मालमत्ता कर वसुलीसाठी आढावा बैठक घेऊन सूचना दिल्याचे सांगितले. जालना शहरात जवळपास ५८ हजार मालमत्ताधारक करपात्र असल्याचेही ते म्हणाले.