लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील १४ केंद्रांवर गुरूवारी ६० वर्षांवरील ६२६ ज्येष्ठांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली तर विविध आजार असलेल्या १६८ जणांनी कोरोनाची लस घेतली. दिवसभरात एकूण १,२०५ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील ज्येष्ठांसह विविध आजार असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. प्रारंभीचे दोन दिवस वगळता नंतर तांत्रिक समस्या काहीशा कमी झाल्या असून, ज्येष्ठ नागरिकांनीही लस घेण्याला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील १३ केंद्रांवर गुरूवारी ज्येष्ठांसह इतरांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागातील ७१ जणांना पहिला डोस तर १९८ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाईन वर्करमध्ये ११५ जणांना पहिला डोस तर २७ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. विविध आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील १६८ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली तर ६० वर्षांवरील ६२६ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. जिल्ह्यात एकूण १,२०५ जणांना ही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.