जालना : परतूर शहरापासून जवळच असलेल्या शेलवडा येथील ४५ वर्षाच्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरून मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास स्पष्ट झाले.
या महिलेला ६ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. सर्दी, खोकला आणि तापेसह या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तिचे दोन स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. पहिला स्वॅब निगेटिव्ह आला होता. तर मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या दुसऱ्या अहवालामध्ये तिला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, शेलवडा येथे तातडीने रात्रीच आरोग्य विभागाचे पथक पाठविण्यात आले असल्याची माहिती परतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. डी. आर. नवल यांनी सांगितले. ही महिला नेमकी कोणा कोणाच्या संपर्कात आली हे तपासले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी पहाटे आशा वर्कर्स, अंगणवाडी ताई आणि आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी घरोघरी जाऊन सर्दी, ताप, खोकला कुणाला आहे काय याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले होते. याच प्रमाणे बाहेर गावारून कोणी आले आहे का? याचीही माहिती घेतली जात होती.