जालना : कोरोनाच्या डेल्टा प्लसमुळे महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी आरोग्य विभाग खबरदारी घेत आहे. परंतु, या लढ्यात नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे पालन करून आवश्यक ती दक्षता घेणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने मोठे थैमान घातले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसमुळे या चिंतेत अधिक वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे जवळपास १६ रुग्ण आढळले आहेत. या धर्तीवर आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्हा प्रशासनाला खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाकडून दैनंदिन तपासण्या वाढविण्यासह लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात दररोज दोन हजार टेस्टिंग सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दैनंदिन दोन हजारांवर तपासण्या केल्या जात आहेत.
जिल्ह्यात अँटिजन तपासणीसह आरटीपीसीआर तपासणीवर भर देण्यात आला आहे. रुग्णांवर रुग्णालयातच उपचार होत आहेत.
विशेषत: नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात लसीकरण करून घ्यावे, यासाठी शहरी, ग्रामीण भागात दैनंदिन सरासरी दीडशे ते दोनशे केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे.
जिल्ह्यात काय खबरदारी?
कोरोनाच्या डेल्टा प्लसपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.
घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. घरी गेल्यानंतरही स्वच्छतेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
सर्दी, खोकला, ताप यांसह इतर कोणताही त्रास होत असेल तर तो त्रास अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपापल्या वयोगटानुसार नियोजित केंद्रावर लसीकरण करून घ्यावे.