जालना : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहने रस्त्यावर आणण्यासही मनाई करण्यात आली आहे. हे मनाई आदेश झुगारून रस्त्यावर येणा-या चालकांवर पोलिसांनी सोमवारी सकाळपासूनच कारवाई सुरू केली आहे. जालना शहरातील जवळपास ३० वाहने सोमवारी दुपारपर्यंत पोलिसांनी जप्त केली होती.
कोरोना विषाणूची साखळी मोडून काढण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांची रस्त्यावर होणारी गर्दी पाहता खासगी वाहन धारकांना पेट्रोल विक्रीस मनाई करण्यात आली आहे. शिवाय खासगी वाहने रस्त्यावर आणण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर येत असून, बाजारपेठेतही गर्दी करीत आहेत.
वारंवार सूचना देऊनही वाहन चालक, नागरिक ऐकत नसल्याने सोमवारी सकाळी चक्क पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचाºयांनी जालना शहरातील प्रमुख चौक, मार्गावर वाहन चालकांची कसून चौकशी सुरू केली. बाहेर फिरण्याचे कारण योग्य असेल तरच संबंधितांना सूट दिली जात आहे. जे विनाकारण फिरत आहेत. त्यांची वाहने जप्त करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी दुपारपर्यंत जालना शहर व परिसरात जवळपास ३० वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.