जालना : शहरातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी शहरातील सर्वच फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांची रॅपिड अँटिजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तपासणी प्रमाणपत्र असेल तरच संबंधित व्यावसायिकाला व्यवसाय करता येणार आहे.
जालना शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि संशयित रुग्ण निदान लवकरात लवकर व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रॅपिड अँटिजन तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. शहरातील भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते यांचा नागरिकांशी अधिक संपर्क येतो. त्यामुळे त्यांची कोरोना अँटिजन तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १३ व १४ आॅगस्ट या दोन दिवसात सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही तपासणी करण्यात येणार आहे.
यात जालना शहरातील जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळा, शहरातील नगर परिषद कार्यालयाच्या बाजूला, फुलंब्रीकर नाट्यगृहात, जुना मोंढा ब्लॉक नं. ४, व्यापारी संकुल जुना मोंढा येथे जि.प. आरोग्य विभाग व नगर परिषदेच्या वतीने ही तपासणी केली जाणार आहे. रॅपिड अँटिजन तपासणी केल्यानंतर ज्यांच्याकडे प्रमाणपत्र सोबत असेल अशाच फळ व भाजीपाला विक्रेते यांना व्यावसाय करता येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्वच फळ व भाजी विक्रेत्यांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी केले आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, बाजारपेठेत सुरक्षित अंतराचा नियम पाळावा, मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.