जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. असे असतानाच सोमवारी येथील कोविड रूग्णालयात एका कोरोना संशयित महिलेला प्रसूती वेदना तीव्र झाल्या. याची माहिती परिचारिकांनी उपस्थित डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तत्परता दाखवित या महिलेचे बाळंतपण सुखरूप केले. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
कोविड रूग्णालय परिसरातून ये-जा करणेही अनेकजण टाळत आहेत. अशा गंभीर वातावरणात कोविड रूग्णालयात लहान मुलांच्या रडण्याने उपचार घेत असलेले रूग्ण भावूक झाले होते. कोरोनामुळे येथील रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जवळपास ४० जण उपचार घेत आहेत. या महिलेला सोमवारी दुपारी प्रसूती वेदना होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिचारिका तसेच डॉक्टरांनी तातडीने त्या वॉर्डात धाव घेतली. अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर त्या महिलेने एका गोड मुलाला जन्म दिला. या मुलाच्या जन्मानंतर खबर दारीचा उपाय म्हणून सदरील आई व मुलाची रवानगी जालना शहरातील गांधीचमन येथे असलेल्या महिला रुग्णालयात केल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात विशेष करून ग्रामीण भागातील महिलांनी खाजगी रूग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी जाण्याऐवजी जालना येथील महिला रूग्णालयात येणे पसंत केल्याचे सांगण्यात आले. गत तीन महिन्यांमध्ये येथे जवळपास १५० पेक्षा अधिक प्रसुती झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महिला रूग्णालयातही विविध उपाययोजना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला रूग्णालयात प्रसुतीसाठी अनेक महिला येत आहेत. या महिलांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे...............