जालना : जालना जिल्ह्यातील दोन कोरोना पॉझिटिव्ह महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे असले तरी, नवीन संशयित रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळी आलेल्या जवळपास २६ संशयितांचे स्वॅब औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी दिली. दरम्यान शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होत चालल्याने जिल्हा प्रशासनाने अनेक कडक निर्णय घेतले आहेत. छुप्या मार्गाने जालन्यात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.
जालन्या शेजारील औरंगाबाद आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. असे असले तरी, अनेक नागरिक हे छुप्या मार्गाने जालन्यात या दोन्ही जिल्ह्यातून दाखल होत आहेत. आता या छुप्या मार्गावरही महसूल तसेच आरोग्य आणि पोलीस विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यापूर्वी जे नागरिक अशा मार्गाने दाखल झाले आहेत, त्यांचा शोध घेण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिका-यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार ग्रामसेवक, तलाठी आणि मंडळ अधिका-यांची याकामी मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच औरंगाबादमध्ये कोरोना कहर वाढत असल्याने जालनेकरांना आताच सतर्क राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात निर्णय घेऊन सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी बिनवडेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, अपर जिल्हाधिकररी रवींद्र परळीकर यांच्यासह अन्य प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पोलिसांनी अधिक सतर्क राहावेया आढावा बैठकीस उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनाही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना चेकपोस्टवर अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष करून अनेक अधिकारी, कर्मचारी हे आजही औरंगाबाद येथून जालन्यात येत आहेत. यावर नजर ठेवण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापुढे केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची परवानगी असेल तरच त्यांना औरंगाबादला जाता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.