जालना : जालन्यात गुरूवारी एकाच दिवशी सर्वाधिक २५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. यात एसआरपीएफचा एक जवान, एक होमगार्ड यांच्यासह १० महिला व १५ पुरूषांचा समावेश आहे. परिणामी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११० वर गेली आहे.
जालना शहरातील कोविड केअर सेंटर मधील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात तीन महिला व तीन पुरूषांचा समावेश आहे. बदनापूर येथील एक ३३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल बाधित आला आहे. अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील सहा जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन महिला व तीन पुरूषांचा समावेश आहे. अंबड येथील शारदानगर भागातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे.
जालना तालुक्यातील कातखेडा येथील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. तर एसआरपीएफच्या एका जवानाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील सामनगाव येथील एका होमगार्डचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११० वर गेली आहे. तर २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.