जालना : शहरातील कादराबाद भागातील एका ६० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सोमवारी सकाळीच शहरातील ४२ जणांसह एकूण ४९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रूग्णालय प्रशासनाकडून रविवारी १८२ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर शनिवारी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ९० नमुन्यांचा अहवाल प्रलंबित होता. रविवारी रात्री सात जणांचा तर सोमवारी सकाळी ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ४२ जणांचा समावेश आहे. यात दुर्गामाता रोडवरील पाच, मस्तगड भागातील तीन, संभाजीनगर मधील दोन, अंबर हॉटेल परिसरातील एक, चौधरीनगर मधील एक, शाकाद नगर मधील एक, पेन्शनपुरामधील तीन, जेईएस कॉलेज परिसरातील एक, खाजगी रूग्णालयातील चार, नाथबाबा गल्लीतील एक, दु:खीनगर मधील एक, कृष्णकुंज भागातील एक, हकीम मोहल्ला येथील एक, गोपालपुरा येथील एक, लक्ष्मीनगर येथील एक, मोदीखाना भागातील तीन, पोलास गल्लीतील दोन, बन्सीपुरा भागातील सहा व इतर चार अशा एकूण ४२ जणांचा यात समावेश आहे. तर रोहिलागड येथील चार,बाजी उंब्रज येथील एक, घनसावंगी येथील एक, बदनापूर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ७७५ वर गेली असून, २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ४१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.