जालना : जुना जालना भागातील शंकरनगर मधील रहिवासी असलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गुरुवारी रात्री सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जुना जालना भागातील शंकर नगर मधील एका ५० वर्षीय व्यक्तीला ह्रदयविकार, न्युमोनियाचा आजार असल्याने कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. तर गुरूवारी रात्री उशिरा सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात अंबड शहरातील नाईकवाडी गल्लीतील पाच, जालना शहरातील जयनगर येथील एक, राज्य राखीव दलातील एका जवानाचा असा एकूण सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आजवर २५५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, आठ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर १४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.