जामखेड (जालना) : कोरोनामुळे ठप्प असलेली बाजारपेठ, शेतात सडणारे टमाटे, मोसंबी आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर यामुळे चिंतीत झालेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी द्रव प्राषण करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी अंबड तालुक्यातील जामखेड येथे घडली.
शिवाजी रामभाऊ डोईफोडे (४५) असे मयताचे नाव आहे. जामखेड येथील शिवाजी डोईफोडे यांचे गावाजवळच असलेल्या नागेशवाडी शिवारात शेत आहे. डोईफोडे हे सोमवारी २० एप्रिल रोजी दुपारी शेतात गेले होते. सायंकाळी ते घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता विषारी द्रव प्राषण केल्याने ते शेतात बेशुधद अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांनी त्यांना पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी शिवाजी डोईफोडे यांचा मृत्यू झाला. मयताच्या पार्थिवाचे औरंगाबाद घाटी रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डोईफोडे यांच्या शेतात दोन एकरावर टमाटे, दोन एकर दिलपसंत, तीन एकरावर मोसंबीचे पीक आहे. पीक हाताशी आले आहे. मात्र, बाजारपेठ बंद असल्याने शेतमालाची विक्री ठप्प होती. तसेच त्यांच्याकडे युनियन बँक आॅफ इंडियाचे पीक कर्ज व ठिंबकचे कर्ज असे सहा लाख रूपयांचे कर्ज थकीत आहे. ठप्प असलेली बाजारपेठ, शेतात खराब होणारा शेतमाल आणि डोक्यावरील कर्जाची चिंता यातूनच शेतकऱ्याने विषारी द्रव प्राषण करून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई, वडिल,पत्नी, दोन मुली, दोन मुले असा मोठा परिवार आहे.