जालना : जालनेकर सध्यातरी कोरोना विषाणूला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश दुकाने बंद असून, संचारबंदी लागू आहे. मात्र, तरीही मंगळवारी सकाळी १०.३० पर्यंत प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाºयांची वर्दळ कायम होती.
जालना जिल्ह्यात सोमवारी रात्रीपर्यंत ४५ संशयित आढळून आले आहेत. पैकी १० जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पहिल्या टप्प्यात शनिवारी २१ मार्च रोजी जिल्हा बंदचे आवहान केले होते. मात्र, शनिवारी दिवसभर दुकाने बंद आणि नागरिक रस्त्यावर अशीच अवस्था जालना शहरासह जिल्हाभरात होती. दुस-या दिवशी रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू कडकडीत पाळण्यात आला. मात्र, सायंकाळी ५ नंतर टाळ्या, थाळ्या वाजविण्यासाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांची रहदारी रात्री उशिरापर्यंत कायम होती. संपूर्ण राज्यातच असे चित्र असल्याने शासनाने सोमवारी सायंकाळी संचारबंदी लागू केली. किमान संचारबंदीमुळे तरी नागरिक घरात बसून कोरोनाशी लढा देतील, अशी अपेक्षा शासन, प्रशासनाला होती. मात्र, मंगळवारी सकाळी १०.३० पर्यंत तरी जालना शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची रहदारी कायम होती.
पोलीस दलाच्या वतीने चौका-चौकात बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेष पथके शहरभर फिरून आवश्यकता नसताना घराबाहेर फिरू नये, घरात बसावे, असे आवाहन करीत आहेत. मात्र, रस्त्यावरील वर्दळ कायम असून, जालनेकरांच्या मनात ना कोरोनाची दहशत ना संचारबंदीची भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी आता हातात दांडुका घेऊन सक्ती केल्यानंतच रस्त्यावरील वर्दळ थांबणार का? असाच प्रश्न आहे.