जालना : भोकरदन तालुक्यातील पारध येथील एका १७ वर्षीय मुलीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी सायंकाळी त्या मुलीचा अहवाल जिल्हा रूग्णालयात प्राप्त झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
पारध येथील सात जणांचे हे कुटुंब मोलमजूरीसाठी गुजरातमधिल सुरत येथे गेले होते. ते २७ एप्रिलला लॉकडाऊन असतांनाही पारध येथे पोहचले. परंतु ग्रामस्थ आणि पोलिसांनी या कुटुंबास गावाच्या सीमेवरच रोखले. तसेच पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी तातडीने आरोग्य विभागाला ही माहिती दिली. ही माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने या कुटुंबातील सदस्यांना जालन्यात उपचारासाठी दाखल केले. या सर्व सातही जणांचे स्वॅब औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ती मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. सदर युवतीला सुरत येथून परततांना प्रवासात कोणाच्या तरी संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. ही मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता जालना येथील कोरोना बाधितांची संख्या दोन झाली आहे. या कोरोना बाधित मुलीवर जालन्यातील आयसोलेशनमध्ये उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.