जालना : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच जिल्हा बंदी देखील करण्यात आली आहे. असे असतानाही जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची इंनकमिंग सुरूच आहे. २२ मार्चपासून जिल्ह्यात आतापर्यंत परजिल्ह्यातून २३ हजार ९७२ लोक आले असल्याची आकडेवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यात १२० विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चपासून ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. परंतु, देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली. देशात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण राज्यात आहेत. त्यामुळे राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. संचारबंदी, लॉकडाऊन, जिल्हाबंदी सरकारने लागू केली आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे नागरिक परजिल्ह्यात आहे त्यांनी तेथेच राहावे, असेही सरकारने सांगितले. परंतु, असे असतानाही २२ मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात २३ हजार ९७२ नागरिक आले आहे. चेकपोस्ट असतानाही परजिल्ह्यातून नागरिकांचा जिल्ह्यात प्रवेश करीत आहे.