जालना : दोन दिवसांपूर्वी मुंबई येथून जालना येथे आलेल्या एका २५ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी सकाळी समोर आले. गत ४ दिवसात जालना जिल्ह्यात बाहेरून आलेल्या ७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता १५ वर गेली आहे.
जालना जिल्हा रूग्णालयात ९ मे पर्यंत केवळ ८ कोरोनाबाधीत होते. पैकी एका कोरोनामुक्त महिलेला रूग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला होता. तर ८ जणांवर उपचार सुरू होते. मात्र १० मे पासून जालना येथे दररोज कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. १० मे रोजी जालना शहरातील इंदेवाडी परिसरात राहणाºया एका गर्भवती महिला व मुंबईहून कानडगाव (ता.अंबड) येथे आलेल्या एका महिलेसह तिच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. सोमवारी ११ मे रोजी जिल्हा रूग्णालयातील एका परिचारिकेसह एसआरपीएफच्या एका जवानाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तर मंगळवारी १२ मे रोजी एसआरपीएफच्या एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
सोमवार ते मंगळवार या तीन दिवसात जालना येथे सहा बाधित रूग्ण आढळून आले होते. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथून रामनगर भागातील एक युवक जालना येथे आला होता. मुंबईहून आल्यानंतर हा युवक जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी गेला होता. मात्र, त्या युवकाच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.