जालना : करमाडजवळ रेल्वे अपघातात १७ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर परप्रांतीय कामगार, मजुरांना परत पाठविण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कामगारांनी आपापल्या तहसील कार्यालयात ५९५ रूपये रेल्वे भाडे भरून नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील उन्नाव जिल्ह्यात जाण्यासाठी १२०० जणांची नोंद झाल्यानंतर पहिली विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.
जालना येथील कंपनीत काम करणाऱ्या १७ परप्रांतीय मजुरांचा करमाड नजीक झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने परप्रांतीय मजुरांना परत पाठविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात जाणाऱ्या कामगार, मजुरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ५९५ रूपये भाडे आकारण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या याद्यानुसार राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे संचालक मनोज देशमुख हे रेल्वे विभागाशी संपर्क साधणार आहेत. १२०० जणांची नोंद झाल्यानंतर रेल्वे विभागाकडून त्यांच्या तिकीटाची सोय करण्यात येणार आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर हे संबंधितांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र, मास्क देण्याचे नियोजन करणार आहेत. संबंधित कामगार, मजुरांनी आपल्या भागातील तहसील कार्यालयाकडे रेल्वे भाडे आणि आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
११०३ अहवाल निगेटिव्हजालना जिल्ह्यात आजवर ११९५ कोरोना संशयित आढळून आले आहेत. स्वॅब घेतलेल्यांपैकी ११०३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर केवळ ८ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एक महिला कोरोनामुक्त झाली असून, इतर ७ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुर्न तपासणीसाठी २२८ स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
रेल्वे मंत्र्यांकडे केला पाठपुरावाजालना तसेच मराठवाड्यातील अन्य भागांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. या सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यात आणि मूळ गावी जायचे आहे. यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याकरिता आपण रेल्वेमंत्री पियूश गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने या विनंतीला मान दिला. लवकरच जालना येथून प्रवासी संख्या निश्चित झाल्यानंतर विशेष रेल्वे सोडली जाणार आहे.- रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री