जालना : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. या शासनाच्या आवाहनाला जालना शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व रस्ते निर्मनुष्य होते. पोलिसांची वाहने फिरताना दिसून आल्या.
विशेष म्हणजे बच्चे कंपनी देखील यावेळी रस्त्यावर खेळताना आढळून आली नाही. गल्ली-बोळात शांतता असल्याने प्रत्येकाच्या घरातील टीव्हीचा आवाज मात्र रस्त्यावर ऐकू येत होता. जालना येथील एमआयडीसी बंद असल्याने तो परिसराही कधी नव्हे तो निर्मनुष्य असल्याचे दिसून आले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह रेल्वे बंद असल्याने दोन्ही स्थानकावर शुकशुकाट होता. पोलिसांनी शहरातील गल्ली-बोळांमध्ये पाहणी करण्यासाठी ड्रोन कॅमेºयांचा वापर केला.