जालना : कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर माझ्या जिवात जीव राहिला नव्हता. मात्र, डॉक्टर, परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांनी धीर दिला. डॉक्टरांनी केलेले उपचार, परिचारिकांनी केलेली मदत यामुळे मी कोरोनाच्या लढाईत विजयी झाल्याचे भावूक उद्गार शेलवडा येथील कोरोनामुक्त महिलेने रुग्णलयातून सुटी भेटल्यानंतर काढले.
परतूर तालुक्यातील शेलवडा येथील कोरोनामुक्त महिलेला बुधवारी २९ एप्रिल रोजी सकाळी जिल्हा रूग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांच्यासह इतरांनी पुष्पगुच्छ देऊन त्या महिलेला निरोप दिला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांनीही टाळ्यांच्या गजरात महिलेला निरोप दिला होता. कोरोनाग्रस्त महिला कोरोनामुक्त झाल्याने संबंधित उपचार करणाऱ्या परिचारिकांसह कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येत होता.
ज्यावेळी मला कोरोनाची लागण झाली, हे समजले त्यावेळी माझ्या जिवात जीव राहिला नव्हता. काय होईल आणि कसं होईल ? या चिंतेने मी व्यतिथ झाले होते. मात्र, रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह इतरांनी मला धीर दिला. त्यांच्यामुळे मागील नऊ दिवस आपण जिल्हा रूग्णालयात उपचार घेतले. सर्वांच्या प्रयत्नांमुळे मी आज कोरोनामुक्त झाल्याचा आनंद असल्याचे भावूक उद्गार त्या महिलेने काढले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही भावूक झाले होते. एका रूग्णवाहिकेतून त्या महिलेला शेलवडा गावाकडे पाठविण्यात आले.