जालना : शहरात मुंबई येथून दोन तर औरंगाबाद येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता अकरावर गेली असून, कोरोनामुक्त एका महिलेला डिश्चार्ज देण्यात आला आहे.
मागील नऊ दिवसात जालना जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला नव्हता. कोरोनाबाधित आठ पैकी परतूर तालुक्यातील एक महिला कोरोनामुक्त झाली असून, तिला डिश्चार्जही देण्यात आला आहे. तर इतर सात रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, परराज्यातून आणि महाराष्ट्रातील इतर राज्यातून नागरिक जिल्ह्यात येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
जिल्हा रूग्णालयात शनिवारी बाहेरगावातून आलेल्या १८ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एक जालना शहरालगतच्या इंदेवाडी येथील तर दोघे अंबड तालुक्यातील करडगाव येथील रहिवासी असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११ वर गेली आहे. एक महिला कोरोनामुक्त झाल्याने तिला डिश्चार्ज देण्यात आला आहे. इतर दहा जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.