जालना : अन्न हे पूर्णब्रह्म म्हणून भारतीय संस्कृतीत ओळखले जाते. मध्यंतरी देशभर फिरत असताना सरकारने सुरू केलेल्या या विद्यार्थ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनेतही भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून आले. यामुळे अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. ही चिंताजनक बाब आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सर्वांनी पारदर्शकतेला महत्त्व देण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले.
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जालना येथील महिको आणि इस्कॉनतर्फे चालविण्यात येणाऱ्या अन्नामृत पोषण आहार योजनेच्या अद्यायावत स्वयंपाकगृहाचे बुधवारी अनावरण करण्यात आले. राज्यपाल म्हणाले, सरकारकडून शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी मध्यान्नभोजन योजना सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली आहे. परंतु, मी मंत्री आणि खासदार असताना देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना या योजनेतही अनेकजण गैरव्यवहार करतात, यामुळे आश्चर्य वाटले. भ्रष्टाचारामुळे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनीही देशातील एक रूपयापैकी केवळ १५ पैसेच हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात, असे विशद केल्याचे कोश्यारी म्हणाले.
१२ लाख विद्यार्थ्यांना मिळतो लाभइस्कॉन केंद्राच्या दहा किलोमीटर परिसरात कोणीही मुलगा अथवा माणूस भुकेला राहू नये, यातूनच २००४ साली मुंबईत प्रथम ९०० मुलांसाठी खिचडी वाटून या अन्नामृत प्रकल्पाचा प्रारंभ झाला. आजघडीला १२ लाख विद्यार्थ्यांना या अन्नामृत योजनेतून ८ राज्यात पोषण आहार पुरविला जात असल्याचे इस्कॉनचे डॉ. राधाकृष्ण प्रभू यांनी प्रास्ताविकात सांगितले.