लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. जवळपास पाचही ठिकाणच्या मतोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट होईल असे सांगण्यात आले.जालना विधानसभेची मतमोजणी ही आयटीआयमध्ये होणार असून, तेथेच ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर तसेच तहसीलदार भुजबळ हे या सर्व प्रक्रियेवर नजर ठेवून आहेत. अशाच प्रकारे भोकरदन, परतूर, बदनापूर आणि घनसावंगी येथे देखील अशीच तयारी करण्यात आल्याचे तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.सोमवारी मतदान झाल्यावर दोन दिवस मतमोजणीच्या मध्ये होते. या काळात उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते.अनेकजण भेटीला आल्यावर आपल्या गावातील मतदान कसे झाले, याची माहिती नेत्यांना देत होते. जिल्ह्यात सर्वाधिक उत्सुकता आहे, ती जालना तसेच परतूर आणि घनसावंगी मतदार संघात, बदनापूर मतदारसंघातही चुरशीची लढत होणार असून, भोकरदनमध्ये माजी आ. चंद्रकांत दानवे चमत्कार करतात काय, याकडेही लक्ष लागून आहे. भोकरदन मतदारसंघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आ. संतोष दानवे हे रिंगणात आहेत.मतमोजणी शांततेत पार पडावी म्हणून सर्वत्र तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालना शहरातील मतमोजणी ही जालना औरंगाबाद मार्गावरील आयटीआयमध्ये होणार असल्याने या महामार्गावरील एका बाजूची वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच पार्किंगची व्यवस्था दोन ठिकाणी करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी दिली.जिल्ह्यातील पाचही मतदारसंघ मतमोजणी केंद्राच्या परिसरात २०० मीटर अंतरावर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार परिसरात बेकायदेशीर जमाव करणे, हत्यार बाळगणे, धुम्रपान करणे, ज्वलनशील पदार्थ नेणे, मतमोजणीच्या २०० मीटर परिसरात कोणताही ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक इ. वापरणे, वाहन आणणे, मोबाईल, कॉडलेस फोन आदींवर बंदी घालण्यात आली.
मतमोजणीची उत्सुकता पोहोचली शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 1:10 AM