वनविभागाची बघ्याची भूमिका : घनदाट जंगल होतेय उजाड
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात मागील काही महिन्यांपासून शासनाच्या कु-हाड बंद आदेशाला हरताळ फासला जात आहे. दिवसाढवळ्या बेसुमार वृक्षांची कत्तल केली जात आहे. याबाबत वन विभागाकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने वनसंपदा धोक्यात आली आहे.
पारध परिसर हा वीस ते पंचवीस गावांचा मिळून विस्तारलेला आहे. एकेकाळी या परिसराची ओळख तालुक्यात वनसंपदेची पंढरी म्हणून होती. या भागात निसर्गाने भरभरुन वनसंपदा दिली आहे. परंतु, मागील पाच ते सहा वर्षांपासून परिसरातील पारध खुर्द, पिंपळगाव रेणुकाई, वरूड, रेलगाव, कोसगाव, अवघडराव सावंगी, मोहळाई, लेहा, शेलुद, जळगाव सपकाळ, कोठा कोळी, करजगाव, कल्याणी, दहिगाव आदी भागासह ईतर भागातील मोठमोठ्या लिंब, बाभूळ, वड, पिंपळ, चंदन, साग, निलगीरी, आंबा, काटशेवरी आदी हिरव्यागार झाडांची कत्तल भरदिवसा अत्याधुनिक औजारांच्या साहाय्याने केली जात आहे.
दिवसेंदिवस पडत असलेला दुष्काळ व निसर्गाचा समतोल बिघडत असताना वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. असे असताना पारध परिसरात निसर्गाविरोधी कृत्य केले जात आहे. शेतकऱ्यांना मोठ्या पैशांचे आमिष दाखवून वनसंपदा नष्ट केली जात आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी रानकसाईला झाडे तोडण्यास नकार दिला त्यांच्या शेतातील झाडे रात्रीच लंपास केली जातात. पारध परिसरातून रोज भरदिवसा ट्रॅक्टर, ट्रकद्वारे तोडलेल्या लाकडांची शहरी भागाकडे वाहतूक केली जाते.
चौकट
एककीडे शासन दरवर्षी झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करीत आहे. असे असतानाच काही बेजबाबदार व पैशांच्या हव्यासापोटी झाडे तोडीत आहेत. त्यामुळे शासनाची झाडे लावा, झाडे जगवा योजना यशस्वी होत नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त समाधान लोखंडे म्हणाले, शासन एकीकडे दुष्काळाला लगाम लावण्यासाठी नवनवीन प्रयोग राबवित आहे. प्रतिवर्षी मोठा गाजावाजा करून वृक्ष लागवड केली जाते. परंतु, वनविभागाच्या काही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे शासनाचा मुळ उद्देश असफल होताना दिसत आहे.