- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : कॅबिनेट बैठकीत चर्चा करून मार्ग काढू, चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईला पाठवा, असे आश्वासन देत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी आरक्षण बचावचे नेते लक्ष्मण हाके व सहकारी नवनाथ वाघमारे यांना पाणी घेण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके सहकारी नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षण बचावसाठी वडीगोद्री येथे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेले आहेत. आज सकाळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपोषण सोडून यावं, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. मात्र, हाके यांनी सर्व मागण्या पूर्ण झाल्यानंतरच उपोषण सोडणार असा पवित्रा घेतल्याने शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली. दरम्यान, ओबीसींना हक्क, अधिकार नाहीत का? सरकार फक्त ठराविक वर्गाचा आहे का? असा सवाल हाके यांनी केला. यावेळी वडीगोद्री येथे राज्यभरातून मोठा जनसमुदाय ओबीसी आरक्षण बचावाला पाठींबा देण्यासाठी येत आहे.
ओबीसींच्या छोट्या घरात घुसखोरीजरांगे सांगतात की ओबीसी आमचा भाऊ आहे, आमच्यात भाईचारा आहे आणि दुसरीकडे ते ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात. ओबीसी भाऊ आहे तर हक्क, अधिकार हिरावून घेत, असताना त्यांचे घर उध्वस्त करतात. ओबीसींच्या छोट्या घरामध्ये घुसखोरी करत असताना तुम्ही त्यांचे मित्र कसे असू शकतो? जरांगे ना शासनामार्फत रेड कार्पेट आथरल जातं, असा आरोप देखील हाके यांनी केला आहे.
उपोषण सोडून चर्चेला यावेउपोषण सोडून चर्चेला यावं,मी तुमची मागणी सरकार दरबारी मांडून मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.- अतुल सावे, पालकमंत्री जालना
आरक्षणाला धक्का लागणार नाहीपाणी पिऊन उपोषण करावे. उद्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून निर्णय कळवला जाईल. ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे.- डॉ.भागवत कराड, माजी केंद्रीय मंत्री
सकारात्मक चर्चा होईल शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा घडवून आणू,मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू - संदिपान भुमरे, खासदार
शिष्टमंडळ चर्चेला जाईल जो पर्यंत राज्य सरकार कडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही याचं लेखी आश्वासन मिळत नाही, तो पर्यंत उपोषण आम्ही सोडणार नाही समाजावर जो अन्याय होतोय, त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत.आम्ही चर्चेसाठी मुख्यमंत्र्याकडे जाणार नाही, आम्ही आमचे शिष्टमंडळ पाठवू शिष्टमंडळातील सदस्यांची नावं लवकरच सांगणार.- नवनाथ वाघमारे (उपोषणकर्ते)
लेखी द्यावेराज्याचं शासन आणि महाराष्ट्रातील सर्वच नेते म्हणताय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही याचं आम्हाला राज्य शासनाकडून लेखी प्रमाणपत्र पाहिजे. ओबीसींना कळत नाही असं शासनाने समजू नये,आमचा समाज शांती प्रिय आहे, आम्ही सामाजिक तेढ निर्माण करत नाही.- लक्ष्मण हाके,ओबीसी नेते