- प्रकाश मिरगे जाफराबाद (जालना ) : सर्वच क्षेत्रात आॅनलाईन कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे. न्यायालयीन कामकाजाची गती वाढविण्यासाठी डिजिटलसाधनांचा वापर सुरू करण्यात आला आहे. आता पक्षकार,विधिज्ञ व प्रकरणांशी संबंधित सर्वांसाठी ई-मेल, मोबाईल अॅप आणि एसएमएसची सुविधा सुरू करण्यात आली असून, न्यायालयीन कामकाज आता हायटेक होत आहे.
न्यायालयात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकरणातील खटले प्रलंबित आहेत. तारीख पे तारीख हे चित्र आता हळूहळू बदलत असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. फिरते लोक न्यायालय, लोकअदालत, विधि सेवा प्राधिकरणातर्फे राबविले जाणारे उपक्रम, विविध शिबिरे या माध्यमातून न्यायालयीन कामकाजाची गती वाढविण्यास प्राधान्य दिले जात आहे.
काही महिन्यांपूर्वीच ई-कोर्ट सेवा नावाचे मोबाईल अॅप सुरु करण्यात आले आहे. अॅप मोबाईलमध्ये राज्यातील कोणत्याही न्यायालयीन प्रकरणांची माहिती मिळविण्याची सुविधा पक्षकारांसह विधिज्ञांना मिळत आहे. ई-कोर्ट सुविधेंतर्गत वकील पक्षकारांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मेलवर प्रकरणाची अपडेट माहिती, प्रकरणाच्या सुनावणीची तारीख कळविली जाते. न्यायालयातील डिजिटल सुविधेचा फायदा पक्षकारांना होणार असल्याचे अॅड. विकास जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
न्यायालयांमध्ये प्रकरण दाखल झाल्यावर संबंधित पक्षकार, वकील यांच्याकडून एक अर्ज भरुन घेतला जात आहे. यात प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचा मोबाईल क्रमांक , ई-मेल याची नोंद केली जात आहे. जुन्या प्रकरणांमध्येही अशी माहिती सादर करण्याची सुविधा आहे. हा अर्ज दिल्यानंतर पक्षकार वकिलांना प्रकरणाच्या प्रत्येक टप्प्यावरील स्थितीची माहिती एसएमएसद्वारे थेट मोबाईलवर कळविण्यात येत आहे.