लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मृग बहार मोसंबीच्या विक्रीसाठी मोसंबी उत्पादक मोठ्या भाववाढीची अपेक्षा ठेवून असले तरी थंडीमुळे मागणीत घट झाली आहे. त्यामुळे उत्पादकांना तूर्तास तरी अपेक्षित भाव मोसंबीला मिळत नसल्याचे चित्र मोसंबी मार्केटमध्ये पहावयास मिळत आहे. शिवाय आता तीन दिवस मोसंबी मार्केट बंद राहणार आहे.उत्तर भारतात सध्या थंडीची लाट सुरू आहे. जालना मोसंबी मार्केटची सर्व मोसंबी भारतातील विविध राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठविली जाते. वातावरणातील बदलामुळे आणि दिल्लीसारख्या ठिकाणी अधून- मधून पावसाच्या सरी पडत असल्याने इतर राज्यातून मोसंबीला असणारी मागणी काही दिवसापुरती थंडावली आहे. त्यामुळे येत्या आठ- दहा दिवसानंतर ही परिस्थिती सुधारली जाईल आणि मोसंबीला चांगला भाव मिळेल, अशी आशा उत्पादकांना आहे. जालना जिल्हा मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.जालना जिल्ह्यातल्या मोसंबीला इतर राज्यांत मोठी मागणी असते. गेल्या चार-पाच वर्षापासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील मोसंबीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. त्यामुळे बहर आंबे असो अथवा मृग; कोणत्याही मोसंबीला प्रति टन २० हजाराच्यावर ते ७० हजारापर्यंत पडती टनाचा भाव जालना मार्केटमध्ये मिळाल्याचा अनुभव उत्पादकांनी घेतलेला आहे.मोसंबी अडतिया असोसिएशनने व्यापाऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती (जालना) यांच्याकडे १५ जानेवारीला मकर संक्रांतीनिमित्त सुटी आहे. त्यामुळे आहे तो माल साठविण्यासाठी अडचणी येत असल्याने १६ जानेवारीला ही मार्केट बंद ठेवण्यात यावे, असे पत्र अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील, सचिव महेश महाजन यांनी दिल्याचे समजते. शिवाय जालना मोसंबी मार्केट अस्तित्वात आल्यापासून शुक्रवारी मोसंबी मार्केट बंद ठेवण्यात येते. त्यामुळे १७ जानेवारीला शुक्रवार येत असल्याने व्यापा-यांकडून एक दिवस आणि संक्रांतीचा एक दिवस तसेच शुक्रवार हे तिन्ही दिवस मोसंबी मार्केट बंद राहणार हे मात्र तितकेच खरे.मकर संक्रांतीचा सण जवळ येऊन ठेपला असल्याने बहुतांश मोसंबी उत्पादकांना थोडी- थोडी मोसंबी विक्री करण्याचा निर्णय सध्या घेतला असल्याने मोसंबी मार्केटमध्ये बºयापैकी मोसंबी विक्रीला येत आहे. सण साजरा करण्यासाठी खरेतर मोसंबी उत्पादक मोसंबी विक्री करण्याची घाई करत आहे. दुसरीकडे त्यांना भाववाढीची आशा लागून आहे. २६ जानेवारी नंतर मृग बहराच्या मोसंबीला निश्चितच वीस ते पंचवीस हजार प्रती टन भाव मिळणारच, असे मोसंबी उत्पादकांचे म्हणणे आहे. सततचा दुष्काळ सहन करीत जगविलेल्या मोसंबीला बाजारपेठेत कमी दर मिळत असल्याने उत्पादक चिंतीत झाल्याचे चित्र आहे.
मोसंबी मार्केट तीन दिवस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:20 AM