भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातून शेतक-यांना रबीच्या पिकासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेल्या पाण्याचा कालवाच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले.जुई धरणातून भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातील जादा पाणी कालव्यात सोडण्यात आले होते त्यावेळी बहुतांश ठिकाणी कालव्याच्या चा-या नादुरुस्त असल्यामुळे शेतक-यांच्या शेतात पाणी शिरले होते. त्यानंतर कालव्यातील पाणी बंद करण्यात आले. मात्र त्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालवा व चा-याची दुरूस्ती करणे आवश्यक होते. पण पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शेतक-यांनी लोकसहभागातून काही ठिकाणी कालवा व चा-याची दुरूस्ती केली. त्यानंतर शेतक-यांना पाटबंधारे विभागाने रबीच्या हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले. मात्र १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान चारी क्रमांक तीन पर्यंत पाण्याचा प्रवाह गेला. तेव्हा चारीला मोठे भगदाड पडले व पूर्ण पाणी शेतातून व लगतच्या नाल्यातून सरळ जुई नदीच्या पात्रात आले. या पाण्याचा प्रवाह ११ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत सुरु असल्यामुळे जुई नदीच्या पात्रात पाणी वाढले. त्यामुळे नेमके नदीच्या पात्रात पाणी कशामुळे वाढले, याचीच चर्चा सुरू होती. तर एकीकडे रबीच्या गहू, हरभरा, मका या पिकांना पाणी मिळण्यापूर्वीच कालव्यातील पाणी हे नदीपात्रातून वाहून गेले आहे़पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियंता आऱएऩदरबस्तरवार यांनी सांगितले की, धरणापासून दोन कि़मी. अंतरावर चारीला भगदाड पडल्यामुळे कालव्यातील पाणी वाहून नाल्यात गेले आहे. धरणातील सुमारे ़०१ द़ल़घमी पाणी नदीपात्रातून वाहून गेले असून सकाळी आपण, कनिष्ठ अभियंता पी़सी़ म्हसने व कर्मचा-यांनी धरणाचा मुख्य दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र रॉड तुटला. त्यानंतर जेसीबीद्वारे गेटच्या आतील बाजूने माती टाकून कालव्यात जाणारे पाणी बंद करण्यात आले. दुपारी १ वाजेपासून गेट बंद करण्यात आले आहे, असे दरबस्तरवार यांनी सांगितले़
जुई धरणाच्या चारीला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:08 AM