जालना - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून राज्यातील सत्ताधारी असलेल्य माहाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवायांमुळे सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील निकलांनंतर भाजपाने सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस होणार का, अशी चर्चा रंगली असतानाच आज केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांनी काँग्रेसच्या एका आमदारांना भाजपात येण्याची खुली ऑफर दिली.
भाजपा नेते भागवत कराड यांनी काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल यांनी भाजपात यावे अशी ऑफर दिली. भागवत कराड म्हणाले की, विकासासाठी जालन्याचे आमदार कैलास गौरंट्याल यांनी विकासासाठी सर्वांबरोबर असतो असे सांगितले. पण तुम्ही जर कायमचे आमच्याबरोबर आलात तर जालन्याचा विकास चांगला होईल, जालना जिल्ह्याचा विकास चांगला होईल, असे भागवत कराड म्हणाले. दरम्यान, भागवत कराड यांनी दिलेल्या या ऑफरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.