तीर्थपुरी: जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे दोन मोठे दरोडे पडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका दरोड्यात चोरट्यांनी तीर्थपुरीतील येथील अमोल काशिनाथ गवते यांच्या खाऱ्या मळ्यातील घरात घुसून त्यांना कोयत्याने मारहाण केली आणि साडेपाच ते सहा लाखांचा ऐवज लंपास केला, तर दुसऱ्या एका दरोड्यात एक लाख दहा हजारांची चोरी करण्यात आली आहे.
शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास नऊ ते दहा चोरट्यांनी काशिनाथ गवते यांच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर घरात झोपलेल्या अमोल गवते यांच्या डोक्यावर आणि पोटावर कोयत्याने वार केले. यादरम्यान, त्यांच्याजवळील सात तोळ्याची सोन्याची चैन, नेकलेस, झुंबर व दोन लाख रुपये कॅश असा एकून साडेपाच ते सहा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
त्यानंतर त्याच रात्री खाऱ्या मळ्यातच राहणारे प्रवीण शिवाजी तांगडे यांच्या घराच्या खिडकीच्या काचा तोडून चोरटे आत घुसले आणि त्यांची दोन तोळे सोन्याची कानातील वेल, मिनी गंठण, लहान बाळाच्या बाळ्या, दहा हजार रुपये कॅश असे एक लाख दहा हजारांची चोरी केली आहे. या दोन घटनांनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, एलसीबीचे भुजंग गोंदी, पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, तीर्थपुरी चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके आदींनी घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली.