- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : या लोकांना उत्तर द्यायचं सुद्धा मला वाईट वाटतं. मराठा समाजात एवढ्या अभ्यासकांनी जन्म घेतला आहे, असं वाटतंय की सरकार पक्षानेच हे लोक पेरले आहेत. मराठा आरक्षणाचे मारेकरी हेच लोक आहेत की काय? यांची पार्श्वभूमी बघितली तर हे सत्ताधारी पक्षाचेच आहेत, अशी टीका बाळासाहेब सराटे यांनी केलेल्या आरोपावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आज माध्यम प्रतिनिधिसोबत संवाद साधला.
सगेसोयऱ्यांची मागणी फक्त जरांगे पाटील करत आहे. ही मागणी त्यांच्या डोक्यात कोणत्या कायदे तज्ञांनी घातली, माहिती नाही असे बाळासाहेब सराटे म्हणाले होते. मनोज जरांगे पुढे म्हणाले, सगेसोयरेची अधिसूचना काढताना वाशीमध्ये तुम्ही होतात तेव्हा गोड लागलं, आम्ही तुम्हाला चर्चेला पाठवलं तेव्हा गोड लागलं. तुम्हाला वाटतं ओबीसीपेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षण चांगल आहे. कशाला ते १६ टक्के आरक्षण चॅलेंज केलं. मग मराठा समाजाला, मला ढ समजता का. मला लांब काढायचं का तुम्हाला? जाऊ का बाजूला मी? सरकारने तुम्हाला आमिष दाखवला असेल. अजूनही वेळ गेली नाही. मराठा अभ्यासकांनी अंतरावली सराटीत येऊन चर्चा करावी असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.
महाराष्ट्रभर पाच टप्प्यात शांतता रॅलीउद्यापासून मनोज जरंगे पाटील यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीचा शब्द दिलाय. मराठा आणि कुणबी एकच असा अध्यादेश काढला पाहिजे. मराठा समाजाला वेळोवेळी रस्त्यावर यावं लागणार आहे. त्यामुळे शांतता रॅली महाराष्ट्रभर काढणं गरजेचं आहे. पहिल्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. पूर्ण महाराष्ट्रभर पाच टप्प्यांमध्ये शांतता रॅली होणार आहे.