जालना : वीज कंपनीने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला आहे. कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रब्बीतील पिके धोक्यात आली असून, जनावरांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महावितरणविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
गतवर्षी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या हातून खरिपातील पिके गेली. या नुकसानीची भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यात उसनवारी करून रब्बी पिकांची पेरणी केली. रोगराईमुळे महागडी औषधे फवारणी केली. आता पिके जोमात आलेली असताना महावितरणकडून रामनगर परिसरातील बहुतांश गावांमधील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. रोहित्र बंद करण्यात आल्याने गत काही दिवसांपासून पिकांना पाणी देणे बंद झाले आहे. याशिवाय शेतातील जनावरांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत.
याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.