n लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. यामुळे ऑनलाइन फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सामाजिक न्याय भवन येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात येत आहे. मागील दहा दिवसात समितीच्या कार्यालयात २५८६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी सामाजिक न्याय भवन येथे उमेदवार गर्दी करीत आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याचा पुरावा वा पावती जोडणे आवश्यक आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाने आपले रूप बदलल्याने राज्य शासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने मंगळवारी जालना शहरातील सामाजिक न्याय भवनात पाहणी केली असता, येथे जात पडताळणीसाठी आलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी काही उमेदवारांनी आपल्या तोंडाला मास्क बांधले होते, तर काही जण विनामास्क होते. यावेळी सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सूचना येथे लावण्यात आलेली नाही, यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांची गर्दी
शासनाने ९ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मुभा दिली आहेत. ११ व १२ वीचे बहुतांश विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सामाजिक न्याय भवन येथे येतात. दररोज सात ते आठ विद्यार्थी येत असल्याचे सांगण्यात आले. हे विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करीत आहे.
६० टक्के उमेदवार
येथील सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीसाठी सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात येत आहे. ६० ते ७० टक्के उमेदवार जात पडताळणीसाठी येतात. काही जण कोरोनाच्या नियमांचे पालन करतात तर काही जण नियमांकडे दुर्लक्ष करतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जात आहेत. आतापर्यंत २५८८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी तीन टेबल तयार करण्यात आले आहे. आलेल्या नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत; परंतु नागरिक याकडे कानाडोळा करीत आहे.
- प्रदीप भोगले, संशोधन अधिकारी.
प्रशासनातर्फे दक्षता
सामाजिक न्याय भवन येथे तीन टेबलवर जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जातात. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नसल्याचे दिसून येत आहे. आलेल्या उमेदवारांना केवळ मास्क लागण्याचे सांगितले जातात.
रोज ५०० प्रस्ताव
सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीसाठी दररोज ५०० ते ६०० प्रस्ताव येत आहे. मागील दोन दिवसांपासून यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत २५८८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. सोमवारी तब्बल ६१५ प्रस्ताव प्राप्त झाले.