जालना : सरकारला जर एकाचा बळी घ्याचा असेल तर घेवू द्या, पण तुम्ही पाणी पिण्याचा हट्ट धरू नका. तुम्ही असा हट्ट धरला तर आपल्या लेकरांना न्याय मिळणार कसा असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळी उपस्थित समाज बांधवांना केला. कोट्यवधी समाजाला न्याय मिळविण्यासाठी एकाच्या जिवाचे काही झाले तरी चालेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे उपस्थित महिला, नागरिकांनी टाहो फोडत मनोज जरांगे यांनी पाणी प्यावे असा हट्ट धरला. तुम्ही आम्हाला पाहिजे. तुम्हाला आज पाणी प्यावे लागेल. आरक्षण आज ना ना उद्या मिळेल, तुमच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळेल. समाजासाठी पाणी प्या. समाजाचे ऐकावे लागेल. माता भगिनी सागत असतील तर पाणी प्यावे लागेल, अशी साद उपस्थितांनी घातली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्याची तयारी दर्शविली.
थोडा म्हणजे किती वेळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोडा वेळ मागितला आहे. पण त्यांना किती वेळ देयचा ते सांगावे. आमचे लोक कधी भरकटत नाहीत. पोलिसांनी आंदोलकांना त्रास देऊ नका. आंदोलन शांततेत सुरू आहे. पण आमच्या वाटेला गेला तर मग मराठे सोडणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लोकांना आवरावे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.