परतूर : तालुक्यातील येणाेरा शिवारातील एका शेतातील कपाशीच्या पिकात लागवड केलेला ३७ लाख रुपयांचा ३ क्विंटल ७० किलो गांजा उपविभागीय अधिकारी व आष्टी पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई परतूर पोलिसांनी शुक्रवारी केली असून, यात एकाला अटक करण्यात आली आहे.
परतूर तालुक्यातील येणोरा गावातील शेतकरी लक्ष्मण निवृत्ती बोराडे (५५) यांच्या शेतातील कपाशीच्या पिकात सहा ते सात फूट उंचीची गांजाची झाडे असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत यांना मिळाली. या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक, आष्टी पोलिसांनी शुक्रवारी सकाळीच छापा टाकला. यावेळी कापसाच्या शेतात गांजाची सहा ते सात फूट उंचीची झाडे दिसून आली. सर्व झाडे उपटून पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
त्याचे मोजमाप केले असता, जवळपास ३ क्विंटल ७० किलो हा गांजा भरला. त्याची अंदाजे किंमत ३७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी शेतकऱ्याला अटक केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके, एएसआय मुंडे, अण्णासाहेब लोखंडे, भीमराव राठोड, राजू काळे, शुभम ढोबळे, इम्रान तडवी, सज्जन काकडे आदींनी केली आहे.