लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतूर येथील नवा मोंढा भागातील अलंकार ज्वेलर्समध्ये भरदिवसा अग्निशस्त्रासह दरोडा टोकणाऱ्या छोटा राजनच्या डीकेराव टोळीतील तिघांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुंबई येथून अटक केली. यातील मनोज भार्गव ईजवा ऊर्फ जिवा याने दहा वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतरही मुंबईसह राज्यात ७ ते ८ दरोडे टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली.२३ मे रोजी परतूर येथील नवा मोंढा भागातील अलंकार ज्वेलर्समध्ये भरदिवसा अज्ञात दरोडेखाऱ्यांनी स शस्त्र दरोडा टाकला होता. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करुन गुन्हयाची पध्दत लक्षात घेऊन तसेच सखोल विचारपूस करुन आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली. त्यानंतर आरोपींचे रेकॉर्ड हस्तगत करुन आरोपीतांची माहिती काढली.सदरील गुन्ह्यातील आरोपी हे मुंबई येथे राहत असल्याची माहिती पोनि. गौर यांना मिळाली. या माहितीवरुन पोनि. गौर हे त्यांच्या पथकांसह मुंबई येथे गेले. त्यानंतर त्यांनी चेंबूर व मुंबई येथील शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची मदत घेऊन गुन्ह्यातील आरोपी महेंद्र सभापती मिश्रा यास ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता, त्याने टोळी प्रमुख मनोज भार्गव ईजवा उर्फ जिवा तसेच लोकेश शिना शेट्टी व इतर साथीदारसह गुन्हा केल्याची कबूली दिली. यावरुन गुन्हे शाखा कक्ष-२ नवी मुंबई यांच्या मदतीने सापळा लावून वरील दोन्ही आरोपीतांना अटक केली.नाशिकचे पथक जालन्यातनाशिक येथील मुथूट फायनान्समध्ये भरदिवसा दरोडेखोरांनी शुक्रवारी दरोडा टाकत गोळीबारा केला होता. दरम्यान, या दरोडेखोरांची व जालना पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखोरांची दरोडा टाकण्याची पध्दत एकच असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी अटकेतील आरोपींची चौकशी करण्यासाठी नाशिक येथील एक पथक शुक्रवारी मध्यरात्री जालना येथे आले होते.मनोज भार्गव ईजवा हा या टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यावर मुंबई, सांगलीसह २२ गुन्हे दाखल आहे. १९९७ साली माटुंगा येथे त्याने अग्निशस्त्र दरोडा टाकला होता. येथे त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे. १९९८ साली माटुंगा येथे १, २००३ साली बोरीवली व विर्लेपाले येथे १ व २००४ साली सांगली येथील कोथरुड येथे १ दरोडा टाकला होता. याच गुन्ह्यात त्याला दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर तो २०१२ ला बाहेर आला. यावर्षीच त्याने गुजरात येथील सिलवासा येथेही दरोडा टाकला होता. त्यानंतर त्याच्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही. दरम्यान, मुंबई पोलीस तीन वर्षांपासून त्याचा शोध घेत होते.
परतूर दरोड्याचे मुंबईत धागेदोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:22 AM