संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते. त्यांच्यातील रूसवे, फुगवे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे सर्वसामान्यांनी देखील याकडे लक्ष दिले नाही. परंतु यात दानवेंचा लक्ष्यभेद करण्यासाठी अर्जुनाने धनुष्यबाण उचलून प्रत्यंचा ताणली देखील होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या वादात श्रीकृष्णाची भूमिका निभावून आधुनिक महाभारताच्या रणांगणावरून अर्जुनाला अखेर माघार घ्यायला भाग पाडले.या सर्व प्रकरणात दोन महिने वाऱ्या सारखे निघून गेले. परंतु याचवेळी दुष्काळाने होरपळणाºया शेतकऱ्यांकडे पाहण्यास कोणालाच वेळ नव्हता. परंतु आता, दादा-भाऊ तुमचे तर पुन्हा गळ्यात गळे पडले असून आता आमच्याकडेही पाहावे, अशी आर्त हाक शेतक-यांमधून ऐकू येत आहे.जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. गेले दोन महिने केवळ दानवे आणि खोतकर यांच्यातील कुरबुरीतच गेले. त्यातही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बैठका घेऊन अधिका-यांना सूचना दिल्या. परंतु त्याकडेही प्रशासनाने चलता है...धोरण स्वीकारले. फेब्रुवारीत आलेल्या आठ चारा छावण्यांच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्यात प्रशासाने धन्यता मानली. इकडे चा-याचे भाव गगनाला भिडले असून, माणसांना देखील पाणी मिळणे दुरापास्त झाले असून, जनावरांसाठी कुठून आणावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आठवडी बाजारात गुरांना मिळेल ती किंमत देऊन जबाबदारीतून पशुपालक मोकळे होत आहेत.अशाही स्थितीत शेतक-यांच्या गंभीर प्रश्नांकडे ना सत्ताधा-यांनी ना लक्ष दिले ना विरोधकांनी. अपवाद केवळ शिवसेनेचा म्हणता येईल. या पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी जवळपास ४० पेक्षा अधिक गावांना भेटी दिल्या. तसेच त्यांचा अहवाल हा पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. मात्र, त्यातून फार काही हाती लागले नाही. आज जिल्ह्यातील पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. ३०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. ही टँकरची संख्या जून अखेरपर्यंत ६०० पेक्षा अधिक होण्याचे संकेत आजच्या परिस्थितीवरून वाटत आहे. एकूणच काय तर आधी बळीराजाच्या नावाने चांगभलं करताना हे राजकारणी आता मतदार राजाच्या नावाने चांगभलं करताना दिसून येत आहेत. आता आठवड्यानंतर लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सोबत प्रचाराचीही रणधुमाळी सुरू होईल. त्यात पुन्हा आचारसंहितेचा बागुलबुवा. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांकडे पाहण्यास ना राजकीय पक्षांना वेळ मिळणार ना प्रशासकीय अधिका-यांना. त्यामुळे यंदाच्या दुष्काळात भरडून जाणे एवढेच ते काय शेतक-यांच्या नशिबात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
दादा-भाऊ तुमचं जमलं.. दुष्काळाने आमचं विस्कटलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:12 AM