अंतरवाली सराटी - मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी त्याग करुन आमरण उपोषण सुरू केले आहे, आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल रविवारी त्यांची प्रकृती खालावली होती, जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. या संदर्भात आता जरांगे यांच्या कुटुंबियांनी काळजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
"आता पाणी पितोय, पण...", आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगेंनी घेतला पाण्याचा घोट
मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांच्या मुलीने अजित पवार यांच्यावर टीका केली. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांची मुलगी म्हणाली, माझ कुटुंब माझ्या समोर आणू नये असं आमच्या पप्पांनी सांगितलं आहे. आता याला सरकारच जबाबदार आहे. आता आणखी कोण उपोषण करत आहेत त्यांनी पाणी तरी घेतली पाहिजे. जरांगे पाटील यांची अवस्था पाहून आईची परिस्थिती वाईट झाली आहे. अजित पवार अंतरवलीत येणार होते पण त्यांना आता डेंग्यू झाला आहे, बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात पण मराठा आरक्षणासाठी म्हटले की लगेच आजारी पडतात, असं सडेतोड उत्तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने दिले आहे.
बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या!
मराठा आरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती रविवारी आणखी खालावली आहे. परंतु, जरांगे-पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला. ‘मला बोलता येते तोपर्यंत तुम्ही चर्चेला या, आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा,’ असा सवाल जरांगे-पाटील यांनी सरकारला केला आहे. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, काही ठिकाणी एसटीवर दगडफेक करण्यात आली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांंनी राजीनामा दिला असून, अनेक नेत्यांना आंदोलकांच्या रोषाला सामेरे जावे लागत आहे.
मराठा बांधवांनी एकजूट व्हावे. फूट पडू देऊ नये. महाराष्ट्रात जिथे जिथे साखळी उपोषण आहे, तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्यावा. उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे-पाटील यांनी केले. सरकारकडून अद्याप संवाद साधण्यात आला नाही. प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेऊ. मला बोलायला त्रास होतोय. मी जास्त बोलू शकत नाही.