लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : पावसाळ््यात धामणा धरण तुडुंब भरले होते. याचवेळी धरणाच्या सांडव्याला गळती लागली. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व धरण समितीने पाहणी करुन सांडव्याची तात्काळ दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतरही धरणाची पाणी गळती सुरूच आहे. यामुळे धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाच्या दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे धामणा धरण आहे. यावर्षी भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने धामणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यातच धरणाच्या सांडव्याला अचानक गळती लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणाची पाहणी करून तातडीने धरण दुरूस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी तज्ज्ञांच्या समितीनेही धरणाची पाहणी केली होती.याला जवळपास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे.मात्र, अद्यापही प्रशासनाने धरणाची दुरूस्ती केली नाही. सध्या धरणाच्या सांडव्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. सध्या धामणा धरणामध्ये ९५ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. या अधिकच्या पाण्यामूळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊन पूर येईल, या भीतीने त्यावेळी घबराट ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती.ऐन पावसाळ््यात ही गंभीर बाब लक्षात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. प्रशासनाने धावपळ करीत धरणाची पाहणी केली.समितीने पाहणी करुन धरणाच्या दुरुस्तीचा अहवाल शासनास सादर केला. परंतु, धरण समितीने पाणी कमी झाल्यानंतर धरणाची दुरूस्ती करण्यात येईल, असे सांगितले होते. सांडव्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही धरणाची गळती थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:33 AM