जालना : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.खरीप हंगामाच्या प्रारंभी कमी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. असे असताना मध्यंतरी पिकांच्या वाढीसाठी पाहिजे तसा पाऊस झाल्याने पिके जोमात होती. असे असतानाच अचानक आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडविली. शेतात खळे करून आता माल बाजारात नेऊन त्याचे पैसे होतील, अशी स्वप्नं बळीराजा रंगवत होता. परंतु, या स्वप्नांवर परतीच्या पावसाने पाणी फेरले.या परतीच्या पावसाच्या फटक्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीन आणि मका पिकाचे झाले असल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाने याचा आढावा घेतला. यावेळी काही तालुक्यातील पंचनाम्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याने त्याची आकडेवारी नव्याने जुळवाजुळव केली जात आहे. बुधवारपर्यंत नुकसानीचे निश्चित क्षेत्र आणि त्याची किंमत काढून अहवाल तयार केला जाणार आहे.
चार लाख ८० हजार हेक्टर पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:23 AM