दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे आरोग्य उपकेंद्रांतर्गत सोमवारी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळत असून, लसीकरणासाठी ग्रामस्थ गर्दी करीत आहेत. आतापर्यंत १९५ जणांनी लस घेतली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मागील काही दिवसांपासून वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. शिवाय लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरील लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. दानापूर येथेही लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले असून आतापर्यंत १९५ जणांनी लस घेतली आहे. लसीकरणासाठी दानापूरसह, दगडवाडी, वडशेद, तळणी, भायडी या गावांतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती नागरे, आरोग्य सहाय्यक आर. पी. सपकाळ, आरोग्य सेवक व्ही. बी. पाडसावने, एस. बी. देशमुख, आशा वंदना बावस्कर, कडू जाधव, आसम्मा शेख, अनिता बावस्कर, संगीता गुरे आदींची उपस्थिती होती.