लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी लागलेल्या पोटनिवडणुकीत रविवारी मतदान प्रक्रिया झाली. यात ६५ टक्के मतदान झाले असून, सोमवारी मतमोजणी होणार आहे.दानापूर येथील ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी पोट निवडणूक लागली होती. निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. वार्ड क्रमांक एक मध्ये तीन जागांवर निवडणूक होत होती. यात एससी महिला ही जागा बिनविरोध निघाली. तर या वार्डातील इतर दोन व वार्ड क्रमांक एक मधील जागेसाठी रविवारी मतदान प्रक्रिया झाली. वार्ड क्रमांक एक मध्ये सर्वसाधरण महिला, सर्व साधारण पुरुष या दोन जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. यात ६६४ पैकी ४६१ मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक तीनमध्ये सर्व साधारण महिला जागेसाठी दोन महिला उमेदवार रिंगणात होते. या वार्डातील ६६० पैकी ४०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भोकरदन पोलीस ठाण्याचे सपोनि बी.बी. वडदे, पोहेकॉ समाधान जगताप, पोहेकॉ बी.ए. सूर्यवंशी, पोहेकॉ जाधव, पोहेकॉ चेके, तलाठी एन.बी. कटारे आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, सोमवारी या मतमोजणी प्रक्रिया होणार असून, या पोट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे दानापूरसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दानापूर येथे झाले ६५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:58 AM