केदारखेडा (ता.भोकरदन): नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये बाजारातील सोयाबीन भरून बाजारात विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी भोकरदन तालुक्यात उघडकीस आला. कृषी विभागाच्या कारवाईमुळे बाजारात जाणारे शेकडो क्विंटल बोगस बियाणे पकडण्यात आले; परंतु या कारवाईपूर्वी या गोदामातून शेकडो क्विंटल बोगस बियाणे बाजारात गेल्याचा अंदाज आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.
केदारखेडा-भोकरदन मार्गावरील बरंजळा लोखंडे पाटीनजीक असलेल्या गोदामात बोगस बियाणांची पॅकिंग करण्याचा गोरखधंदा दोन महिन्यांपासून सुरू होता. पूर्णा-केळना शेतकरी प्रोड्यूसर कंपनीने हे गोदाम भाडेतत्त्वावर घेतल्याचे समजते. या गोदामात बाजारातून आणलेले बियाणे कोणतीही प्रक्रिया न करता नामांकित कंपन्यांच्या बॅगेत भरण्यात येत होते. महाराष्ट्रात विक्री परवानगी नसलेल्या तेलगंणा येथील लोकप्रिया सीड्स, तसेच औरंगाबाद येथील बायडेन ॲग्रोटेक कंपन्यांच्या बॅगेत हे बियाणे भरण्यात येत होते. या गोदामात फुले संगम वाणाच्या बँगेत २५ किलोच्या वजनाच्या २१३ तर बायडन कंपनीच्या ११९ बॅगामध्येही सोयाबीन बियाणे भरल्याचे आढळून आले. त्यावर लाॅट नंबर, उत्पादन तारीख नव्हती, तसेच ५२ किलो वजनाचे ३५० सोयाबीन बियाणाचे पोते साठवण्यात आले होते. दरम्यान या गोदामातून शेकडो क्विंटल बोगस बियाणे बाजारात विक्रीसाठी गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हे बियाणे काेणत्या जिल्ह्यात नेण्यात आले. त्याचा शोध लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे. बोगस बियाणे करणारे कोण ?कृषी विभागाने अंदाजे छापा टाकलेल्या गोदामातून २६३ क्विंटल बियाणे जप्त केले आहे. रात्री उशीरापर्यंतचा कृषी विभागाने पंचनामा केला. परंतु, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या रॅकेटमध्ये मोठे लाेक सहभागी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दोषींवर कठोर कारवाई लोकप्रिया सीड्स कंपनीच्या उत्पादित सोयाबीन बियाणाची विक्री करण्याची परवानगी महाराष्ट्रात नाही. यासंदर्भात सविस्तर अहवाल दोन दिवसांत कृषी आयुक्तालयाकडून आम्हाला प्राप्त होणार आहे. संबधित शेतकी कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.- जी. आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी