लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर -वाटूर रस्ता जागोजागी खोदून ठेवल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. दोन आठवड्यांत या मार्गावर चार अपघात झाल्याने वाहनधारकात धास्ती पसरली आहे. धूळ आणि खडीमुळे या मार्गावरुन वाहने चालविणे धोकादायक ठरत आहे.पंढरपूर - शेगावमार्ग वाटूर परतूर आष्टी मार्ग जात आहे. गेल्या अकरा महिन्यापासून या मार्गाचे काम सुरु आहे. मात्र संबंधित गुत्तेदाराने रस्त्याचे काम टप्याटप्याने न करता रस्ताच अनेक ठिकाणी खोदून ठेवला आहे. मात्र परिसरातून वाहने जाण्यासाठी पर्यायी रस्ताच ठेवला नाही. यामुळे खोदकाम केलेल्या मार्गावरुनच वाहनधारकांना ये- जा करावी लागते. धूळ आणि खडीमुळे वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड झाले आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या दोन आठवड्यात चार अपघात घडले आहेत. यात श्रीष्टी येथील आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.तसेच अनेक जण जायबंदी झाले आहेत. मात्र संबंधित गुत्तेदाराचे या कडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील प्रमुख मार्ग असल्याने यामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. जड वाहनामुळे अपघात वाढले आहेत. रस्त्याचे कामे पूर्ण होईपर्यत या मार्गावर जड वाहनांना बंदी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करुन वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे.
वाटूर-परतूर रस्ता धोकादायक; अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:49 AM