दानवे विरुद्ध औताडे लढत रंगणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:19 AM2019-03-23T00:19:48+5:302019-03-23T00:20:17+5:30
जालना लोकसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विद्यमान खा. रावसाहेब दानवेंना भाजपने उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसकडून २०१४ च्या निवडणुकीत दानवेंना जबरदस्त टक्कर देणाऱ्या विलास औताडे यांच्या नावावर दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरा खलबले सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विद्यमान खा. रावसाहेब दानवेंना भाजपने उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसकडून २०१४ च्या निवडणुकीत दानवेंना जबरदस्त टक्कर देणाऱ्या विलास औताडे यांच्या नावावर दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरा खलबले सुरू होती. औताडेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याने दानवे विरूद्ध औताडे अशी लढत रंगणार आहे.
खा. रावसाहेब दानवे यांची उमेदवारी दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून त्यांच्या विरूद्ध कोण येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ती आता संपली असून, काँग्रेसच्या महाराष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे आणि माजी सभापती भीमराव डोंगरे यांची नावे हायकमांडकडे गेली होती. परंतु, हायकमांडने औताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक गोटातून समजते.
जालना लोकसभा मतदार संघात गेल्या २१ वर्षापासून काँग्रेसला आपले खाते उघडता आले नाही. १९९६ आणि १९९८ मध्ये उत्तमसिंग पवार यांनी बाजी मारली होती. तर १९९९ पासून खासदार दानवेंचेच या मतदारसंघावर वर्चस्व कायम राहिले आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी खासदार दानवेंनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पाच वर्षात भाजपने येन-केन प्रकारे सत्तेची समीकरणे जुळवून शिवसेनेपेक्षा राज्यात आपले वर्चस्व सिध्द करून मोठा भाऊ होण्याचा मान मिळविला.
जालना लोकसभा मतदार संघाचा विचार करता केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने रावसाहेब दानवेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून बरेच विचारमंथन करण्यात आले. दानवेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला गेला. परंतु, माजी आ. कल्याण काळे आणि सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे औताडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
या निवडणुकीत दानवेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेसमधील आपसातील मतभेद दूर ठेवून एकत्र आल्यास ही निवडणूक दानवेंसाठी चुरशीची ठरू शकते. त्यामुळे सर्व जिल्ह्याचे लक्ष जालन्याकडे लागले आहे.
बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसहेब दानवेंनी शेतकऱ्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या मुद्यावरून त्यांना टक्कर देण्याचे आव्हान अपक्ष आ. बच्चू कडू यांनी वर्षभरापूर्वीच दिले होते. त्या दृष्टीने त्यांनी संघर्ष यात्रा काढून रण तापवण्याचा प्रयत्न केला होता. प्रहार पक्षाकडून ते दानवेंना आव्हान देणार असून मंगळवारी जालन्यात येत आहेत. शकुंतला मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पदाधिकारी साईनाथ चिन्नादोरे यांनी दिली. कडू काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.