लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : गायनाचार्य स्व. गोविंदराव जळगावकर यांच्या ‘अवघेचि त्रैलोक्य आनंदचि आता’ या ध्वनिमुद्रित भैरवीने येथील ९५ व्या दत्त जयंती संगीतोत्सवाची भावपूर्ण सांगता झाली. या समारोपाच्या संगीत सभेत पं. हेमंत पेंडसे, पं. राजेंद्र कंदलगावकर, पं. विश्वनाथ दाशरथे, शाश्वती चव्हाण यांनी गायन तर आदित्य देशमुख यांनी तबलावादन सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.येथिल आयोजित ९५ व्या दत्त जयंती व स्व. गोविंदराव जळगावकर स्मृती संगीत समारोह रविवारी तरूण आणि ज्येष्ठ कलावंतांच्या गायन वादनाने संपन्न झाला. संगीत सभेचा प्रारंभ पुण्याच्या शाश्वती चव्हाण यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग बिहाग सादर केला. ‘कैसे सुख सहू’ ही विलंबित एकतालातील, ‘आली रे आली बेलीया’ ही मध्यलय त्रितालातील आणि ‘बनी बनी ठणी ठणी आवत आवत’ ही चीज द्रुत झपतालात विस्ताराने सादर करीत त्यांनी अभ्यासपूर्ण आश्वासक गायकीचा परिचय करून देत ‘रूप पाहता लोचनी’, या ज्ञानदेवांच्या रचनेने वातावरण भक्तीमय केले.त्यांना हार्मोनियमवर शशी सारस्वत तर तबल्यावर राजगोपाल गोसावी यांनी साथ केली. मूळ अंबड येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात वास्तव्य असणाऱ्या आदित्य देशमुख यांनी सोलो तबला वादन सादर केले. त्यांनी ताल त्रिताल सादर करीत बनारस घराण्याच्या वादनशैलीचा परिचय करून दिला. दाया आणि बाया वर त्यांचे असणारे प्रभुत्व त्यांनी बहारदार वादनाने दाखवून दिले. त्यांना हार्मोनियमवर देवेंद्र देशपांडे यांनी लहेरा धरून उत्कृष्ट साथ दिली. औरंगाबादचे पं. विश्वनाथ दाशरथे यांनी राग दुर्गा सादर करीत या मैफिलीचा ताबा घेतला. विलंबित मत्ततालामध्ये त्यांनी ‘आब तो आये घन’ आणि द्रुत एकतालामध्ये ‘घुंगरवा मोरा बाजे’ ही चीज तब्येतीने सादर करीत श्रोत्यांना डोलायला लावले.
दत्त जयंती संगीतोत्सवाची भावपूर्ण सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:43 AM