लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : शहरातील श्री. राधाकृष्ण- नवनाथ संस्थानमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता वेदमंत्रोच्चारात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प. पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प. पू. प्रल्हाद महाराज (साखरखेर्डा) यांच्या आशीर्वादाने मागील आठ दिवसांपासून दत्त जयंती सप्ताहा निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.श्री दत्तक्षेत्र गाणगापूरच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी गेल्या तीन दशकांपासून दत्त जन्मोत्सव साजरा होतो. मंदिराचा परिसर फुले व विद्युत दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. बुधवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान वेदमंत्रोच्चारात भगवान दत्तात्रेय जन्मोत्सव सोहळ््यास सुरूवात झाली. श्रीदत्तात्रेयांची बालमूर्ती फुलांनी सजविलेल्या पाळण्यामध्ये ठेवण्यात आली होती. दुपारी १२ वाजता पाळणा हलवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यापूर्वी मठाधिपती प. पू. भास्कर महाराज यांनी साजरा करण्यात येणाऱ्या सप्ताहाचे फलित आणि या पासून भक्तांना मिळणारे समाधान यांची माहिती दिली. तर अकोला येथील हभप. जोशी यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून श्री दत्त महिमा या विषयी उपस्थित भक्तांना माहिती दिली. गुरूवारी महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.
दत्तात्रेयांचा जन्मोत्सव वेदमंत्रोच्चारात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 1:20 AM