लोकमत न्यूज नेटवर्कसिपोरा बाजार : गवतातून विषबाधा झाल्याने सिपोरा बाजार येथील मेंढपाळाच्या ४२ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील माणिक लक्ष्मण सोरमारे, कैलास पिराजी काळे यांनी नेहमीप्रमाणे रविवारीही आपल्या मेंढरांना रानात चारण्यासाठी नेले. दिवसभर मेंढ्या चारून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी आणत असताना अचानक एकेक मेंढी मरून पडत असल्याचे निदर्शनास आले. या मेंढ्यांना बोरगाव जहा. येथील गट नं. २८३ मधील आनंदा सीताराम सोरमारे यांच्या शेतात अखर बसविण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून परतत असताना हा प्रकार घडला. या शेतात चरत असतानाच मेंढ्यांना विषबाधा झाली. त्यामुळे वरील प्रकार घडला. या विषबाधेची लागण कळपातील जवळपास १००हून अधिक मेंढ्यांना झाली आहे. आतापर्यत ४२ मेंढ्या दगावल्या असून आणखी काही धोक्यात आहेत. या प्रकरणी नायब तहसीलदार काशीनाथ तांगडे व तलाठी आर.ए. जायभाये यांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
विषबाधा झाल्याने ४२ मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 1:10 AM