जाफराबाद : यंदा कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशी उपटण्यापूर्वी अनेक शेतकरी पिकांत जनावरे चरण्यासाठी सोडतात. मात्र, बोंडबळीग्रस्त पीक खाल्ल्याने जनावरांचा मृत्यू होऊ लागल्याचे जाफराबाद परिसरातील घटनांवरून दिसून येत आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली आहेत. बोंडअळीमुळे कपाशी पिकाचेही नुकसान झाले आहे. कपाशी उपसून टाकण्यापूर्वी अनेक शेतकरी या कपाशी पिकात जनावरे चरण्यासाठी सोडतात. मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेले पीक जनावरांसाठी घातक ठरत आहे. वरखेड (ता. जाफराबाद) येथील शेतकरी गजानन उबाळे यांच्या म्हशीने बोंडअळीग्रस्त कपाशी खाल्ली होती. मात्र, बोंडअळीग्रस्त कपाशी खाणाऱ्या त्या म्हशीचा बुधवारी अचानक मृत्यू झाला. म्हशीचे निधन झाल्याने तिचा संभाळ करणारा राम हा धायमोकलून रडत होता. या घटनेत उबाळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पशुधनाच्या विम्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यात शेतकरी आपली जनावरे कपाशी पिकात सोडत आहेत. थोडेही दुर्लक्ष झाले आणि जनावरांनी बोंडअळीयुक्त किंवा रासायनिक औषधी फवारलेली पिके खाल्ली तर मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे पिकात जनावरे सोडताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
संजय मोरे,
प्रमुख, ग्रोव्हिजन गटशेती संघ